आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे सध्या संपूर्ण देशभरात त्यांच्या धडाडीच्या कार्यामुळे लोकप्रियतेच्या लाटेवर आहेत. कायदा-नियम यांच्या चौकटीत आपल्या प्रत्येक कृतीला बसवून ते एक प्रकारे कायद्याचे राज्य या देशात चालू शकते, असा आशावाद उभा करताना दिसतात. अशा धडाडी राखून असलेल्या मुंढे यांच्या संघर्षशील आयुष्यावर बेतलेले शफी पठाणलिखित ‘तुकाराम’ या नावाचे चरित्र नुकतेच प्रकाशित झाले. पुणे येथे वाचक चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने वर्तमानतले अनेक सामाजिक-राजकीय प्रशासकीय पैलू समोर आले…
नागपूर, जालना, नांदेड जिल्ह्यातील नागरी समस्यांवरचे काम तडीस नेणारा सजग अधिकारी, पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी प्रवेशबंदीचा घेतलेला निर्णय घेणारा खमका प्रशासक, नवी मुंबईत लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी दर रविवारी रस्त्यावर भेटायला जाणारा कार्यतत्पर आयुक्त, दिव्यांग खात्यात असताना बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वितरित करणारे विविध भागांतील रॅकेट उद्ध्वस्त करणारा संवेदनशील अधिकारी आणि आता अन्न व औषध खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अन्नातील भेसळी-विरोधात अक्षरशः जनचळवळ उभी करणारा कर्तव्यकठोर अधिकारी अशा विविध रुपांत तुकाराम मुंढे आजवर समोर आले आहेत.
मुंढे यांची ही प्रशासकीय शैली सत्ताधाऱ्यांना उलट फायद्याची वाटायला किंवा साहाय्यभूत वाटायला हवी. पण तसे होताना दिसत नाही. उलट सत्ताधारी मुंढेंची अडचण करतात आणि मुंढेही सत्ताधाऱ्यांना कायद्याच्या नियम-चौकटीत आव्हान देतात. परिणाम असा की, मुंढे आपल्या पदावर सात-आठ महिनेही काढू शकत नाहीत. नेहमी अपूर्ण असे काम त्यांच्या वाट्याला येत राहते. तरीही मुंढेंच्या कार्यशैलीत तसूभरही फरक पडलेला नाही.
आपल्या देशातील सरकारी यंत्रणा ही मुजोर, लोकांच्या प्रश्नाला बेदखल करणारी, भ्रष्टाचारी आणि शिरजोर स्वरुपाची आहे. मुंढे याच बजबजलेल्या यंत्रणेतील एक अधिकारी आहेत. पण लोकांचे मुंढेंविषयीचे मत मात्र पूर्णपणे वेगळे आहे.
जुलै महिन्याच्या १७ तारखेला मुंढे यांच्यावरची ‘तुकाराम’ नावाची बायोग्राफी (न्यू एरा पब्लिशिंग हाऊस, मूल्य : २५० रुपये) पुण्यात प्रकाशित करण्यात आली. शफी पठाण या पत्रकाराने मुंढे हे आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात रेखाटला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाला किमान चार ते पाच हजार वाचक चाहते हजर होते. एखाद्या मराठी पुस्तकाच्या प्रकाशनाला हजारो नागरिक उपस्थित राहतात, ही घटनाच मुळी अभूतपूर्व समजली पाहिजे. परंतु ही घटना एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर या पुस्तकाच्या ३० हजार प्रतींची प्रकाशनपूर्व नोंदणी झाल्याचे तसेच एकूण लाखभर प्रती विक्रीला गेल्याचे प्रकाशकांनी जाहीर केले. हा तर मराठी प्रकाशन विश्वाला बसलेला धक्का होता. मराठीतच काय तर देशभरातील कोणत्याही प्रादेशिक भाषेत एखाद्या पुस्तकाची पहिली आवृत्ती एक लाखापर्यंत विकली गेलेली नाही. हा आकडा वाढत जाईल, ते मराठीतील बेस्टसेलर म्हणून गणले जाईल.
पण मुद्दा तो नाहीये. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी महाराष्ट्रातून आलेली शेकडो मुले होती. प्रत्येकाच्या डोळ्यात कर्तव्यदक्ष अधिकारी कसा दिसतो, कसा वागतो याविषयी प्रचंड उत्सुकता होती. आकर्षण होतं. इकडे मुंढेंच्या पुस्तकाचे प्रकाशन सुरू असताना देशात जंतर मंतरवर नीट पेपरफुटीवरून तरुणांचे मोठे आंदोलन सुरू होते. या आंदोलनातील तरुणांमध्ये जो व्यवस्थेविषयी संताप, राग आणि अस्वस्थता दिसत होती, त्याचे प्रतिबिंब या संपूर्ण कार्यक्रमात उमटलेले दिसत होते. मुंढे हे आपल्या स्वप्नांना वाट करून देतील, मार्ग दाखवतील, या देशात कायद्याचे राज्य येईल, असा आशावाद या तरुणाईच्या डोळ्यांत दिसत होता. एक व्यक्ती सिस्टीम सरळ करू शकते, असा भाबडा समजही त्यांच्या ठायी दिसत होता. एक प्रकारची हतबलता म्हणा किंवा साचलेपणा म्हणा, पण कोंडीत सापडलेली मुलं कोणीतरी मार्ग दाखवतोय या आशेने येथे आलेली होती.
व्यासपीठावर उपस्थित असलेले रंगनाथ पाठारे, राजीव खांडेकर, संग्राम गायकवाड, अशोक मुंढे, संजय नहार आदी मान्यवर वक्तेही जमलेल्या गर्दीमुळे अवाक् होऊन गेल्याचे दिसत होते. लोकशाही सांभाळण्याची प्रत्येकाची जबाबदारी असते याची जाणीव हे वक्ते करून देत होते. वातावरणात एकाएकी गांभीर्य आले होते. मुंढेंसारखा अधिकारी सिस्टिमशी नव्हे, तर सिस्टिमवर कब्जा करून बसलेल्यांविरोधात लढतोय हा सूर अप्रत्यक्षपणे उलगडला जात होता.

शोध मसिहाचा
पण, मुद्दा पुन्हा तोच की समाजाला मसिहाची गरज का लागते? समाजाला सदासर्वकाळ एखादा आयडॉल का हवा असतो? अशा आयडॉलमुळे समाजाला वळण मिळते का ? तर याचे उत्तर नकारार्थी तर अर्थातच नाही. म्हणूनच तुकाराम मुंढे यांच्याकडे केवळ एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या नजरेने पाहून चालणार नाही. त्यांच्या लोकप्रियतेकडे समाजशास्त्रीय आणि राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज आहे. ज्या समाजात एखादा अधिकारी नियम पाळतो, भ्रष्टाचाराला आव्हान देतो, नागरिकांशी थेट संवाद साधतो आणि कायद्याची समान अंमलबजावणी करतो, तेथे तो ‘अपवाद’ ठरतो. आणि अपवाद ठरणाऱ्या व्यक्तीभोवतीच नायकत्वाचे वलय निर्माण होते.
खरा प्रश्न मुंढे यांचा नाही. खरा प्रश्न असा आहे की, आपली प्रशासकीय व्यवस्था अशी कशी आहे की, प्रामाणिकपणा हा सामान्य नियम न राहता अपवाद बनतो आहे? जनतेला प्रत्येक वेळी एखाद्या ‘मुंढे’ची वाट का पाहावी लागते आहे? वस्तुतः कायद्याचे राज्य व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर अवलंबून राहणार असेल, तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. म्हणूनच कायद्याचे राज्य व्यक्तीच्या धैर्यावर नव्हे, तर संस्थांच्या सामर्थ्यावर उभे राहिले पाहिजे, हा खरा मुद्दा आहे.
त्यामुळे तुकाराम मुंढे यांची लोकप्रियता एखाद्या अधिकाऱ्याच्या यशाची गोष्ट नाही; ती आपल्या व्यवस्थेतील अपयशाचीही ठळक नोंद आहे. लोकशाही मूल्य स्वीकारलेल्या समाजाला विश्वासार्ह व्यवस्था हवी असते. पण जेव्हा व्यवस्था विश्वासार्हता गमावते, तेव्हा एखाद्या व्यक्तीमध्येच लोक आपल्या आशा आकांक्षा शोधू लागतात. मुंढे यांच्या सभोवती उभे राहिलेले हे आकर्षण, ही गर्दी आणि हा आशावाद त्यामुळेच दिसतो. तो योग्य की अयोग्य याचे, उत्तर ज्याचे त्याने शोधायला हवे आहे.
ज्येष्ठ, पत्रकार, लेखक असलेले सुजय शास्त्री हे सध्या लोकमत समूहात वृत्तसंपादकपदी कार्यरत असून, ‘समतावादी मुक्त-संवाद पत्रिका’ मासिकाच्या सल्लागार संपादक मंडळाचे सदस्यही आहेत. संपर्क : sujayshastri@gmail.com

