Headlines

    चित्रपट संस्कृतीचे जतन आणि संवर्धन ही एक कलाच

    0 Shares

    शिवेंद्र सिंग डुंगरपूर

    डॉ. संतोष पाठारे

    आपल्या आसपास गडगंज अनेक असतात; साधनसामग्रीची कमतरता नसलेलेही अनेक असतात; व्यवस्थेवर प्रभाव असलेले, एका इशाऱ्यावर व्यवस्थेला झुकायला लावणारेही अनेक असतात पण कलेचे भान, कलेच्या जतन-संवर्धनाचे भान असलेले शिवेंद्र सिंग डुंगरपूर यांच्यासारखे मोजकेच असतात. जाहिरात क्षेत्रातले एक नावाजलेले व्यक्तिमत्व असलेले, ‘सेल्युलॉइड मॅन’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या माहितीपटाची निर्मिती केलेले शिंवेद्र सिंग ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’च्या माध्यमातून चित्रपट जतन-सवर्धनाचे अत्यंत मोलाचे काम करताहेत. त्यांच्या या उत्कटतेने व्यापलेल्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारी ही खास दिवाळी विशेष मुलाखत…

    चित्रपट माध्यमाकडे आपण दोन घटका करमणूक या नजरेने पाहत असलो तरीही ते संस्कृती जतन करण्याचे एक सशक्त माध्यम आहे, याची आपल्याला जाणीव असतेच असे नाही. वस्तुतः चित्रपटांमध्ये काळाच्या दस्तऐवजीकरणाची एक जबरदस्त क्षमता आहे. लघुपट, कथात्म चित्रपट आणि माहितीपट, या सर्वांतून त्या त्या काळातील समाजजीवनाचे जिवंत दर्शन घडत असते. चित्रपटातील कथानके आणि पात्रे काल्पनिक असली तरीही त्या पात्रांचे पोशाख, पात्रे वापरत असलेली उपकरणे, साधने, खाद्यपदार्थ या सगळ्यांत कथानकाच्या काळाचे प्रतिबिंब पडलेले असते.

    अवघा एकशे तीस वर्षांचा इतिहास असलेला रुपेरी चित्रपट चित्रित करण्याची साधने काळानुसार बदलली असली तरीही त्याची रुपेरी पडद्यावरील प्रतिमा प्रेक्षकांना कायम आकर्षित करत आलेली आहे. कॅमेऱ्यामधील ८ मिमी, १६ मिमी, ३५ मिमी आणि सिनेमास्कोप रिळांवर चित्रित होणारा चित्रपट आता गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून डिजिटल कॅमेऱ्यातून चित्रित होऊ लागला आहे. चित्रपटक्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान रुजू होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून दिग्दर्शक आणि त्याचा गोतावळा लक्षणीय कलाकृती निर्माण करत आहेत. या कलाकृती ज्या चित्रफितींवर चित्रित झाल्या आहेत त्या चित्रफिती, त्यांचे रंग, त्यांचे जतन आणि संवर्धन योग्य पद्धतीने झाले नाही, तर त्या कालौघात खराब किंवा नष्ट होऊ शकतात. दिग्दर्शकांनी ज्या कलात्मक दृष्टीने चित्रपटाची निर्मिती केली आहे, ती चित्रफितीच्या नाशामुळे कायमची हरवून जाऊ शकते, या कारणास्तव त्या चित्रफितींचे मूळ स्वरूपात जतन करून ठेवण्याच्या कामाला अतीव महत्त्व प्राप्त झाले आहे. हे काम एक प्रकारे संस्कृती-संवर्धनाचेच काम आहे. त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य फार मोठे आहे.

    भारतात सरकारी पातळीवर चित्रपटांचे संग्रहालय करण्याची योजना १९६०च्या दशकात अमलात आणली गेली. पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जागतिक दर्जाच्या चित्रपटांचे, त्या संदर्भातील पुस्तकांचे, पोस्टर्सचे संवर्धन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पी. के. नायर यांच्यासारख्या द्रष्ट्या चित्रपट अभ्यासक, रसिकाचे अपार कष्ट या क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रियेत जोडले गेले. परंतु कालांतराने सरकारी पातळीवर सुरू असलेले हे प्रयत्न काहीसे अधुरे ठरले. काळाचा रेटा पाहता या कामाला सुस्पष्ट स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ने पुढाकार घेतला. २०१४ साली ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ स्थापन करणारे शिवेंद्र सिंग डुंगरपूर हे मूळचे जाहिरात आणि चित्रपटक्षेत्रात काम करणारे सर्जनशील कलावंत. मात्र एका विशिष्ट क्षणी त्यांना चित्रपट जतन, संवर्धन यासंबंधी जी आस्था निर्माण झाली त्यातून गेल्या दहा वर्षांच्या काळात त्यांनी ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’च्या माध्यमातून एक चळवळ उभी केली. चित्रपट माध्यमाबर नितान्त निष्ठा असल्याशिवाय हे कार्य यशस्वीपणे पूर्ण करणे शक्य नव्हते.

    शिवेंद्रना मी सर्वप्रथम भेटलो होतो २०१३च्या आशियाई चित्रपट महोत्सवात. याच वर्षी भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाली होती. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘सेल्युलॉइड मॅन’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता माहितीपट महोत्सवाचा सेंटरपीस होता. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक पी. के. नायर यांच्या कार्यावरील हा माहितीपट निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट प्रत्येक दृश्यातून दिसत होते. त्या माहितीपटानंतर शिवेंद्र यांचे ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’चे काम सुरू झाले. या कामाची व्याप्ती प्रचंड वाढत गेली. दरम्यानच्या काळात ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’तर्फे घेण्यात येणाऱ्या कार्यशाळांबद्दल माहिती मिळत होती. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या आणि या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या काही तरुणांसोबत संवाद साधता आला होता. दोन वर्षांपूर्वी शिवेंद्र यांनी ‘मामि’ महोत्सवाचे संचालक म्हणून सूत्र हाती घेतली. महोत्सवात त्यांची भेट झाली, पण त्यांच्या कामाविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी स्वतंत्रपणे भेट घेणे आवश्यक होते. शिवेंद्र यांच्या व्यग्र वेळापत्रकात अशी भेट मिळेल की नाही, याबद्दल मी साशंक होतो. आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करत असताना एका मीटिंग दरम्यान किरण व्ही. शांताराम यांनी शिवेंद्रना फोन लावला. ती संधी साधून मी शिवेंद्र यांच्याशी त्याच कॉलवर बोललो. शिवेंद्रनी तत्काळ भेटीची तारीख ठरवली. जुलै २०२५मधील मुंबईच्या पावसाने या भेटीत दोन वेळा अडथळा आणला. पण अखेरीस शिवेंद्र यांच्या ताडदेवच्या ऑफिसमध्ये भेटीचा योग आलाच. मी ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’च्या ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा बाहेर धुवाधार पाऊस पडत होता. शिवेंद्र त्यांच्या कामात व्यग्र होते. ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’चे ऑफिस नावाप्रमाणेच चित्रपटांच्या इतिहासाची साक्ष देणारे! भिंतीवर जगभरातील अभिजात चित्रपटांची पोस्टर्स, शिवेंद्र यांची यिरी मेंझल, पी. के. नायर यांच्या सोबतची छायाचित्रे आणि एका काचेच्या कपाटात ठेवलेला वेगवेगळ्या ब्रँडचा कॅमेरा!

    थोड्याच वेळात प्रिंटेड निळा झब्बा आणि पायजमा परिधान केलेले शिवेंद्र त्यांची एक ऑनलाइन मीटिंग संपवून माझ्यासमोरील लाकडी खुर्चीत येऊन बसले आणि आमच्या गप्पांचा सिलसिला सुरू झाला. चित्रपटप्रेम त्यांच्या मनात लहानपणापासून कसे रुजले त्याबद्दल शिवेंद्र सांगू लागले,

    ***

    “बिहारमधील डुमराव गावचे राजे महाराज कमलसिंग आणि महाराणी उषा हे माझ्या आईचे आई-वडील! त्या दोघांना चित्रपट पाहण्याचा विलक्षण छंद होता. त्यांच्यामुळे मला सिनेमा पाहण्याची आवड निर्माण झाली. त्या काळात लोकांसाठी चित्रपट हे मनोरंजनाचे एकमेव माध्यम होते. मी जेव्हा आजोळी जात असे, मला आजी-आजोबांसोबत हॉलीवुडचे, चार्ली चॅप्लीनचे अनेक चित्रपट पाहायला मिळत. माझ्या आजोबांची सिनेमा पाहण्याची एक खास खोली होती; ज्याला आम्ही ‘थंडा रूम’ म्हणत असू. त्या भव्य वास्तूत ती एकमेव खोली वातानुकूलित होती. या खोलीमध्ये असलेला प्रोजेक्टर चंडी मिस्त्री नावाचे गृहस्थ ऑपरेट करायचे. जेव्हा चित्रपट दाखवला जायचा, तेव्हा मी त्याच्यासोबत असायचो. का कोण जाणे, पण सिनेमाची रीळ डब्यातून बाहेर काढून त्याचा वास घेणे मला खूप आवडायचे. चंडी मिस्त्री फिल्म्सची रीळ प्रोजेक्टरवर कशी लोड करतात, सिनेमाचे प्रोजेक्शन कसे होते, याचे मी बारकाईने निरीक्षण करायचो. यामुळेच माझ्या मनात सिनेमा माध्यमाविषयी कुतूहल निर्माण झाले.

    “आमच्या घरी माझ्या बाबांनादेखील चित्रपट पाहायला आवडायचे. ते स्वतः त्यांच्या ८ मी.मी.च्या कॅमेरातून घरात होणाऱ्या समारभांचे चित्रीकरण करायचे. माझ्या बालपणीच्या अनेक घटना त्यांनी चित्रबद्ध केल्या आहेत. त्यांना पाहून मी सेल्युलॉइडकडे आकर्षित झालो. गंमत म्हणजे लहानपणी माझ्या वडिलांनी मला हिंसाचाराने व्यापलेला ‘शोले’ पाहण्यास मनाई केली होती. आज त्याच बहुचर्चित ‘शोले’ची प्रिंट मी रीस्टोर केली आहे; जी लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.”

    “पुढे मी डून स्कूलला शिकायला गेल्यानंतर तिथे जवळच असलेल्या चित्रपटगृहात मला अनेक देशी-विदेशी चित्रपट पाहायला मिळाले. चित्रपटांची तिकिटे, पोस्टर जमा करण्याचा छंदही मी या काळात जोपासला. माझ्याकडे असलेल्या छोट्याशा डायरीत मी पाहिलेल्या चित्रपटाच्या नोंदी करत असे. मी विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर चित्रपटावरील प्रेमापोटी चित्रपटक्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने मुंबईत आलो. ‘लेकिन’ आणि ‘लिबास’ या चित्रपटांसाठी मी गुलज़ार यांचा सहायक म्हणून काम केले. गुलज़ार यांनी मला एफ.टी.आय. आय. मध्ये जाण्याचा सल्ला दिला. स्वतः गुलज़ार यांनी फिल्म मेकिंगचं कोणतंच औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही, पण ते एकेकाळचे दिग्गज असलेल्या बिमल रॉय यांच्या तालमीत तयार झाले होते. मी मात्र एफ.टी.आय. आय. मधून प्रशिक्षण घ्यावे, असा त्यांचा आग्रह होता. मी फॉर्म भरला आणि प्रवेशपरीक्षा दिली. माझा इंटरव्ह्यू खुद्द श्याम बेनेगल यांनी घेतला. म्हणूनही मी म्हणत असतो, ‘गुलज़ार आणि श्याम बेनेगल या दोघांचे माझ्या कारकिर्दीत महत्त्वाचे स्थान आहे. एफ.टी.आय. आय. मध्ये मी दिग्दर्शन आणि पटकथा लेखनाचे धडे घेतले.”

    जतनाचा नाद जडला

    एफ.टी.आय. आय. मधून बाहेर पडल्यानंतर शिवेंद्र यांनी चित्रपट दिग्दर्शनास सुरुवात केली. ‘बजाज अलायन्स’सारख्या अर्थगर्भ जाहिरातीमुळे जाहिरात क्षेत्रात त्यांचं नाव गाजलं. त्यांनी पंधराशेहून अधिक जाहिराती दिग्दर्शित केल्या. मात्र अशी यशस्वी कारकीर्द सुरू असताना फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्वेशन सारख्या अनवट मार्गावर ते कसे वळले, याची माहिती देताना शिवेंद्र सांगतात, “मी हॉलीवुडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसी यांची एक मुलाखत वाचली. त्यात त्यांनी बोलोग्ना (इटली) मधील एका चित्रपट महोत्सवाचा उल्लेख केला होता. जिथे रिस्टोअर्ड केलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन केले जाते. मार्टिन स्कोर्सेसी हे स्वतः फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्वेशनच्या कार्यात व्यग्र असतात. पंडित रवी शंकर यांनी त्यांच्या बंधूंनी म्हणजेच उदय शंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कल्पना’ या चित्रपटाची चित्रफित रिस्टोअर्ड करण्याची विनंती मार्टिन स्कोर्सेसी यांना केली होती. दुर्दैवाने ती मूळ चित्रफित मिळवणे त्यांना शक्य होत नव्हते. मी मार्टिन स्कोर्सेसी यांची भेट घेतली आणि त्यांना या संदर्भात मदत करण्याचे आश्वासन दिले. भारतात आल्यानंतर मी आणि माझे एफ.टी.आय. आय. चे काही मित्र या संदर्भात चर्चा करण्यासाठी पुण्याला पी. के. नायर सरांना भेटायला गेलो. त्या वेळी नायर सर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातून निवृत्त झाले होते. ते संग्रहालयाच्या समोर ‘चतुर’ बंगल्यात राहत होते. गंमत म्हणजे आमच्या एफ.टी.आय.आय.च्या वास्तव्यात आम्ही नायर सरांना वचकून असायचो. ते फार कोणाशी बोलायचे नाहीत. स्वतःच्या कामात गुंग असायचे. चित्रपट पाहताना हातात छोटा टॉर्च आणि एक डायरी त्यांच्याकडे असायची. त्या डायरीत ते चित्रपट सुरू असताना नोंदी करायचे. आम्ही सर्व विद्यार्थी त्यांच्याकडे फक्त चित्रपटातील होळीची गाणी मिळवण्यासाठी आणि विशिष्ट चित्रपट दाखवण्याची विनंती करण्यासाठी जात असू. या वेळी मात्र आमचा त्यांच्याकडे जाण्याचा हेतू वेगळा होता. आम्ही त्यांना फिल्म रिस्टोरेशनबद्दल विचारले तेव्हा ते काहीसे अस्वस्थ झाले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या तत्कालीन व्यवस्थेवर ते नाराज होते. त्यांनी आम्हाला तिथे नेले. तिथली अवस्था पाहून आम्हाला धक्का बसला. ‘बॅटलशिप पोटेमकिन’, ‘वाइल्ड स्ट्रॉबरीज’ अशी अभिजात चित्रपटांची नावे लिहिलेल्या रिळांच्या डब्यांवर बसून काही विद्यार्थी वाचन करत होते. ही मुले जिथे राहतात तिथले दिवे जातात म्हणून त्यांना इथे बसण्याची परवानगी देण्यात आल्याचे आम्हाला सांगण्यात आले. जागतिक चित्रपटांचे जतन-संवर्धन करणाऱ्या संस्थेची अशी दुरवस्था पाहून आम्ही देखील व्यथित झालो.

    निःशब्द नायकांचा शोध

    “फिल्म रिस्टोरेशनच्या संदर्भातील पी. के. नायर सरांचे विचार चित्रित करून ते एनडीटीव्हीसारख्या वाहिनीवरून प्रसारित करावेत, जेणे करून प्रशासकीय पातळीवर या विषयाची चर्चा होऊन त्यावर काही उपाय योजले जातील, या उद्देशांनी मी चित्रीकरण करण्याचा विचार केला. पी. के. नायर सर त्यांचे विचार मांडणार असल्याने हे चित्रीकरण सेल्युलॉइडवर करण्याचा निर्णय मी घेतला. माझा प्रकाशचित्रणकार मित्र संतोष धुंडीयिल सर्वप्रथम माझ्या मदतीला आला. यातूनच ‘सेल्युलॉइड मॅन’ या माहितीपटाची निर्मिती झाली. आवर्जून सांगायचे म्हणजे पी. के नायर सर स्वतःबद्दल काही बोलायला उत्सुक नव्हते. त्यांनी चित्रपट माध्यमाच्या क्षमता, भारतीय चित्रपटांची वैशिष्ट्ये, चित्रपटसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन याबद्दलचे त्यांचे मौलिक विचार मात्र खुलेपणाने मांडले. मी त्यांना ही फिल्म तुमच्याबद्दल नाही, असे खोट बोलत चित्रीकरण करत राहिलो. एफ.टी.आय. आय. मधून प्रशिक्षण घेऊन चित्रपटक्षेत्रात नामवंत झालेल्या अनेक कलाकारांनी नायर सरांबद्दलच्या आठवणी सांगितल्या. भारतात अनेक ठिकाणी आम्ही चित्रीकरण केले. तब्बल अकरा प्रकाशचित्रणकारांनी या फिल्मचे प्रकाशचित्रण केले. भारतीय चित्रपटाच्या इतिहासाचा खूप मोठा दस्तऐवज या फिल्मच्या निमित्ताने तयार झाला. २०१३चा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला. त्यातूनच पुढे माझ्या फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्वेशनच्या कामाला दिशा मिळाली. भारतात विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून हजारो चित्रपटांची निर्मिती केली गेली आहे. या चित्रपटांच्या चित्रफिती कुठे असतील; कोणत्या अवस्थेत असतील हे जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली.”

    “माझा जन्म राजस्थानमधील राजघराण्यातला. आमच्या परिवाराला हजार वर्षांचा इतिहास आहे. मला माझ्या पूर्वजांचा हा इतिहास माहीत आहे. प्रिझर्वेशनची वृत्ती माझ्या रक्तात वंशपरंपरेने आली आहे. संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या माझ्या वडिलांचा प्रभाव माझ्यावर आहे.”

    “पी. के नायर सरांवरील फिल्म करून थांबणे माझ्या शोधक वृत्तीला मानवणारे नव्हते. तुमच्या चित्रपटाने तुम्हाला कृतिशील बनवायला हवे. ‘सेल्युलॉइड मॅन’ने मला ती संधी उपलब्ध करून दिली. मी आणि माझ्या पत्नीने ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ची स्थापना केली. याच दरम्यान मी जागतिक दर्जाचे चेक दिग्दर्शक यिरी मेंझल यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा ‘चेकमेट: इन सर्च ऑफ यिरी मेंझल’ हा माहितीपट केला. फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावणाऱ्या रसिकांना यिरी मेंझल यांचे ‘क्लोजली गार्डेड ट्रेन’, ‘आय सर्व्हड् द किंग ऑफ इंग्लंड’सारखे अभिजात चित्रपट स्मरणात असतील. त्या वेळी यिरी मेंझल काही कारणामुळे मीडियावर नाराज होते. मी प्रागला गेलो होतो तेव्हा त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीस त्यांनी मला योग्य तो प्रतिसाद दिला नाही, पण ‘नंतर मात्र हा कोण भारतीय मुलगा आहे; ज्याला माझ्याशी बोलण्याची उत्सुकता आहे?’ असा विचार करून ते मला भेटले. माहितीपटासाठी सहकार्य करण्याची त्यांनी तयारी दाखवली. या माहितीपटाच्या निमित्ताने मी जगभरात फिरलो. केन लोच, ख्रिस्तोफ जानुस्की, इस्तवान झाबो, आंद्रे वायदा या जगविख्यात दिग्दर्शकांना भेटलो. आपल्या आवडत्या दिग्दर्शकांना भेटणे; त्यांची दिग्दर्शनाची प्रक्रिया जाणून घेणे यातून मी अधिक समृद्ध होत गेलो. या भेटीतून माझ्या फिल्म रिस्टोरेशनच्या कामाबद्दलच्या धारणा दृढ होत गेल्या.”

    जतन-संवर्धनाचे मोल अनमोल

    फिल्म रिस्टोरेशन आणि प्रिझर्वेशन म्हणजे नेमके काय? त्याची काय आवश्यकता आहे? या प्रश्नांची उत्तरे शिवेंद्र फार नेमकेपणाने देतात.

    “ज्याप्रमाणे चित्रपट निर्माण करणे ही कला आहे, त्याचप्रमाणे तो ज्या स्वरूपात निर्माण केला गेलाय त्याच स्वरूपात कायम टिकवून ठेवण्यासाठी काम करणे हीदेखील एक कलाच आहे. ‘Film Restoration is an art!’ आपल्याकडे ‘रिस्टोरेशन’ आणि ‘प्रिझर्वेशन’ या संकल्पनाच अजून लोकांना माहीत नाहीत. अर्थात त्यामुळे त्याचे महत्त्वही कोणाच्या लक्षात येत नाही. या बाबतीत एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असतानाच्या काळात ताजमहालाच्या एका भागाचा संगमरवरी दगड निखळला. त्याच्या जागी दुसरा उच्च प्रतीचा दगड लावून डागडुजी करण्यात आली. पण त्यावर युनेस्कोने आणि इतर तज्ज्ञांनी आक्षेप घेतला. बदली केलेला दगड उच्च प्रतीचा असला तरीही तो ताजमहालच्या इतर दगडांसारखा नव्हता. त्याच्यामुळे ताजमहालच्या सौंदर्याला बाधा येत होती. या आक्षेपानंतर शहाजहानने ज्या खाणीतून ताजमहालासाठी संगमरवरी दगड आणले होते तिथून दगड मागवून पुन्हा डागडुजी करण्यात आली. फिल्म रिस्टोरेशनचे काम नेमके हेच आहे. ज्या फॉरमॅटमध्ये फिल्म शूट केली आहे, त्याच स्वरूपात ती पुन्हा आणणे म्हणजे रिस्टोरेशन करणे. पूर्वी सेल्युलॉइडच्या चित्रफिती चित्रीकरणासाठी वापरात येत. कालांतराने या चित्रफिती खराब होतात. त्यावरील रंग फिके होऊन जातात. डिजिटल तंत्रज्ञान येण्याआधी जगभरातील सगळेच चित्रपट सेल्युलॉइडवर चित्रित झाले आहेत. हे चित्रपट डिजिटल माध्यमात रूपांतरित करता येत असले तरीही त्यांचे मूळ स्वरूप जतन केले तर ते चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. आम्ही ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ तर्फे अभिजात चित्रपटांचे रिस्टोरेशन करायला सुरुवात केली. त्या मालिकेत गिरीश कासारवल्ली यांचा ‘घटश्राद्ध’ (कन्नड), श्याम बेनेगलांचा ‘मंथन’, अरिबम शाम शर्मा यांचा ‘ईशानू’ (मणिपुरी), अरविंदन गोविंदन यांचा ‘थंप’ (मल्याळम) हे चित्रपट आम्ही रिस्टोअर केले. चित्रपटांच्या बरोबरीने चित्रपटांशी संबंधित साहित्य, पोशाख, पुस्तक, पोस्टर्स यांचेही रिस्टोरेशन आम्ही करत आहोत.

    “या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी परदेशातील तज्ज्ञ मार्गदर्शकांना बोलावून कार्यशाळा आयोजित करतो. या कार्यशाळा आयोजित करण्यासाठी आम्हाला ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्ह’ या संघटनेचे सातत्याने सहकार्य मिळत आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनादेखील आम्ही या कार्यशाळेत सहभागी करून घेतले आहे. देशातील वेगवेगळ्या भागांत या कार्यशाळा आयोजित केल्यामुळे प्रादेशिक चित्रपटांचे रिस्टोरेशन होण्याच्या प्रक्रियेला वेग मिळालाय. चित्रपट माध्यमाचा अभ्यास करणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या अभ्यासू रसिकांसाठी हे एक नवीन दालन खुले झाले आहे.

    “आम्ही चित्रपटांच्या इतिहासाचे आणि सुखद आठवणींचे जतन करण्याचे काम करत आहोत. या कामाचा आवाका खूप मोठा आहे. अभिजात चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करून ते प्रेक्षकांनी पाहावेत, यासाठी आम्ही जे प्रयत्न केले त्याला आता यश येत आहे. सध्या दक्षिण मुंबईतल्या रिगल चित्रपटगृहात आम्ही दर आठवड्याला एका रिस्टोअर्ड चित्रपटाचे विनाशुल्क प्रदर्शन करतो. क्रिस्टोफर नोलान, कुब्रिक, अल्फ्रेड हिचकॉक या दिग्दर्शकांचे चित्रपट आम्ही आजवर प्रदर्शित केले आहेत. काही चित्रपटांच्या दिग्दर्शकांनाही आम्ही प्रदर्शनाच्या वेळी आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधतो. या उपक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळते आहे.”

    ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ची पुढची वाटचाल कशी होणार त्याबद्दल सांगताना शिवेंद्र म्हणतात,

    “इतिहासाचे जतन करण्याच्या या कार्याला उज्ज्वल भविष्य आहे. ज्या चित्रपटांचे रिस्टोरेशन करणे कठीण आहे, अशा चित्रपटांवर आम्ही काम करत आहोत. पुढच्या पिढीला हे चित्रपट मूळ स्वरूपात पाहता यायला हवेत, या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.”

    “माझी सगळी कारकीर्द महाराष्ट्रात घडलेली असल्यामुळे मला मराठी चित्रपटांविषयी विशेष आस्था आहे. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांनी त्यांचे काही चित्रपट मला दिले आहेत. ज्या निर्मात्यांना त्यांचे चित्रपट सुस्थितीत जतन करायचे असतील त्यांना ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’चे सहकार्य नेहमीच मिळेल, हेही मला आपल्यातल्या या संवादाच्या निमित्ताने आवर्जून सांगायचे आहे. चित्रपट संवर्धनाबरोबरच आम्ही चित्रपट आणि चित्रपटकर्ते यांच्यावरील साहित्यसुद्धा निर्माण करत आहोत. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असले तरीही बाबूराव पेंटर यांनी चित्रपटांना कलेचा दर्जा मिळवून दिला. त्यांच्या कारकिर्दीवर आधारित एक पुस्तक राजेश देवराज लिहीत आहेत. ‘अमृत मंथन’, ‘अमर ज्योती’सारखे चित्रपट निर्माण करणारे व्ही. शांताराम या चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाचे दर्शन घडवणाऱ्या दुर्गा खोटे, शांता आपटे यांच्यावरील संशोधनाचे कामही आम्ही हाती घेणार आहोत. एकूणच मराठी चित्रपटसृष्टीला माझ्यातर्फे योगदान देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

    “माझे गुरू पी. के. नायर सर म्हणायचे, ‘अन्न आणि निवाऱ्याच्या तुलनेत संस्कृतीला प्राधान्य नसले तरीही माणूस केवळ अन्नावर जगत नाही. त्यांच्या मनालादेखील पोषणमूल्ये लागतात.’ विसाव्या शतकात चित्रपट आणि दूरदर्शन हे दोन महत्त्वाचे सांस्कृतिक स्रोत माणसाने निर्माण केले आहेत. अशा वेळी भावी पिढीसाठी चित्रपटसंस्कृतीचे संवर्धन करणे, ही आपली नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे. हे कर्तव्य गांभीर्यपूर्वक पार पाडू शकलो नाही, तर आपण या कार्यात अपयशी ठरू, या कार्याला तसा थोडा उशीर झालाय, पण निदान आता सुरुवात तर चांगली झालीय, ही माझ्या दृष्टीने अतीव आनंदाची गोष्ट आहे.”

    * * *

    शिवेंद्र सिंग डुंगरपूर यांनी या क्षेत्रातले अध्वर्यू पी. के. नायर यांचा वारसा पुढे नेत स्वप्रयत्नांनी चित्रपट जतन आणि संवर्धनाचे एक नवे दालन खुले केले आहे. ते केवळ चित्रपटकलेचेच नव्हे, तर या कलेतल्या माइल स्टोन ठरलेल्या ऐतिहासिक क्षणांचेही जतन करत आहेत. या त्यांच्या उत्कटता राखून असलेल्या चित्रपटसंस्कृतीच्या जतन-संवर्धनात या ना त्या रूपाने आपण सर्वानीच म्हणजेच वाचक-प्रेक्षकांनी, संशोधक-अभ्यासकांनी आपापला वाटा उचलला, तर भारतीय चित्रपटांचा अभिमानास्पद वारसा पुढच्या कितीतरी पिढ्यांना समृद्ध करत राहील.

    * * *

    डॉ. संतोष पाठारे हे अध्यापन, लेखन, माहितीपटांचे दिग्दर्शन, चित्रपट महोत्सवांचे आयोजन, रसग्रहणात्मक कार्यशाळा आर्दिमध्ये व्यग्र असलेले मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व आहे. संपर्कः ९८२०३ ७४०९३

    Author

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *