Headlines

    शून्याच्या शिखरावर त्या कडा चमकल्या…

    0 Shares

    स्वप्निल गणेश कुलकर्णी

    निसर्गात भटकंती करणारे असंख्य असतात. पर्वतारोहणाचा नादही असंख्यांना असतो. पण फारच थोड्यांपर्यंत निसर्गाची नेमकी हाक पोहोचते. संत कबीर ज्याचा उल्लेख शून्यशिखर असा करतात, त्या उंचीपर्यंतच्या चढाईतले मर्म आकळते. अशाच फार थोड्यांना रोजचे पाश तोडून निसर्गाशी आत्मीय संवाद साधायचा असतो. निसर्गाशी एकरूप होता होता आत्मशोधाचीही वाट चालून पाहायची असते. नवतरुण साहसवीराने भटकंतीतून, गिर्यारोहणातून आत्मबळाची परीक्षा घेत, निसर्गाची वाट चालताना आलेल्या समृद्ध अनुभवांना दिलेले हे शब्दरूप…

    ही हू डज नॉट ट्रॅव्हल, हू डज नॉट रिड,

    हू डज नॉट फाइंड ग्रेस इन हिमसेल्फ, डाइज स्लोली

    इंडियन फॉरेस्ट सर्विसच्या परीक्षेचा अभ्यास करता करता ६००० मीटर उंचीचे शिखर सर करण्याचे स्वप्न मनाला साद घालत होते. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा अभ्यासापेक्षाही अधिक आत्मीयतेने शोध सुरू केला. अल्पायिन स्टाइलमध्ये स्वबळावर मोहीम कशी हाती घेता येईल, यावर अधिक भर होता. त्यातही कमीतकमी खर्चात सगळे जुळवून आणायचे होते. याआधी बरेच ट्रेक स्वतःहून पूर्ण केले होते, मात्र सेमी-टेक्निकल श्रेणीचा आणि इतक्या उंचीचा हा पहिलाच अनुभव असणार होता. परीक्षा संपताच मुंबईहून रेल्वेने चंदीगड, पुढे बसने मनाली, तिथून शेअर टॅक्सीने लेह असा २५०० कि.मी.चा प्रवास पार पडला. लेहमध्ये साधनसामग्रीची जमवाजमाव केली. शरीराने वातावरणाशी जुळवून घेतले आणि बेस कॅपच्या दिशेने रवाना झालो.

    मार्खा वॅलीच्या दिशेने ३० किलोच्या बॅगा डोलवत मोहिमेला सुरुवात झाली. तेव्हा लेह हे उंचीवर असलेले एक अद्भुत वाळवंट आहे, याचा प्रत्यय पदोपदी येत होता. नजर जाईल तिथवर दिलखेचक डोंगररांगा वेड लावत होत्या. त्या भव्यतेच्या पार्श्वभूमीवर आपल्या अस्तित्वाची सूक्ष्मता अधिक ठळकपणे अधोरेखित होत होती.

    हिरवीगार शेती, दगडी घरे, रंगीबेरंगी फडफडणाऱ्या ध्वजपताका, एका आवेगाने खळखळत वाहणारी नदी यांनी नटलेला मार्खा गाव १२,००० फुटांवर आपली वेगळीच छबी टिकवून जगाच्या नजरेआड शांततेत नांदत होता. त्या वेळी हाडे गोठवणाऱ्या थंडीत हान्ले येथे पाहिलेली आकाशगंगा आजही मनावर कोरली आहे. तो क्षण एखाद्या टीपकागदासारखा जितके काही टिपता येईल तितके टिपून, साठवून घेत होतो. दुसऱ्या दिवशी हान्लेवरून कारू लेक असा प्लॅन होता. टीममध्ये दोन लोकांच्या भरतीमुळे मोहिमेला नकळत वेग आला होता. हा वेग नकोसा वाटत होता. मात्र परमिट त्यांच्या नावावर असल्यामुळे त्या डेडलाइनला धरून चालणे अनिवार्य होते.

    आव्हान कोसळे धबाधबा

    जागतिक सरासरीपेक्षा हिमालयीन प्रदेशांत तापमान वाढ अधिक प्रकर्षाने होत आहे. म्हणूनच ३५ डिग्री तापमानात चालणे जिवावर येत होते. पाठीवर विचित्रसे वजन जाणवत होते. त्यात माझ्या दोन्ही पायांना मोठे मोठे फोड आलेले. अशा अवस्थेत दुपारी १ वाजता कारू लेक गाठले. कँप इथे सेटअप करायचा असे आधी ठरले होते. मात्र थोडी रेकी केल्यावर जाणवले की इथल्या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नाही. पाण्यामध्ये हिमपर्वतावरून वाहून आलेली बारीक वाळू दिसत होती. मग काय? वेगवेगळ्या पद्धतीने पाणी शुद्ध कसे करता येईल, यावर विचारमंथन सुरू झाले. टीशर्टने फिल्टर करायचा प्रयत्न केला. बाटलीमध्ये फर्न, छोटे दगड, मोठे दगड टाकून गाळण तयार केले. मात्र काहीच यशस्वी होत नव्हते. येताना रस्त्यात विश्रांती घेत असताना जड बॅगेसोबत कुठेतरी बसलो, तेव्हा माझी दीड लिटरची बाटली वाटेत कधी पडली, हे कळलेच नाही. कोणाकडेच पाणी शिल्लक नव्हते. पु. ल. देशपांडेंच्या ‘असा मी असामी’ मधला नायक रणरणत्या उन्हात हवा असलेला पत्ता शोधताना म्हणतो, तशी रामराया जन्मल्याची तळतळत्या उन्हाची ही वेळ, उंची १४,५०० फूट, त्यात ऑक्सिजनचा कमालीचा विरळपणा आणि याचमुळे सोबत असलेल्या सगळ्यांचा पारा चढलेला. मी जराही चालण्याच्या अवस्थेत नव्हतो. आधीच फोडांमुळे ठणकणारे दोन्ही पाय गर्मीमुळे वेदनेत अधिकच भर घालत होते. काय करायचं, यावर बोलणं चाललेलं असतानाच अचानक एक जण बॅग उचलून चालू लागला. म्हणाला, “पुढच्या कँप साइटला जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही.” मला त्या क्षणी चालणे खरेच शक्य नव्हते. बाकी दोघेही त्याच्यामागे चालू लागले. मी शांतपणे त्यांना इशारा केला की ऊन कमी होताच, मीही येईन तुमच्यापर्यंत.

    अशा खडतर मोहिमेत एखाद्या साथीदाराला एकटे मागे सोडून जाणे किती योग्य, हा वेगळ्या चर्चेचा विषय असू शकतो. मात्र गिर्यारोहण हे मुळातच स्वार्थी आव्हान. आयुष्यासारखेच. स्वार्थ आणि निःस्वार्थ यातला समतोल ज्याला राखता आला, तो खऱ्या अर्थाने समृद्ध. त्यामुळे कोण योग्य आणि कोण चुकीचे हा सारा दृष्टिकोणाचा खेळ.

    उन्हापासून बचाव करण्यासाठी एका छोट्या झोपडीत मी निवान्त बसलो होतो, तेवढ्यात काही इस्रायली ट्रेकर्स तिथे विश्रांती घ्यायला आले. ते वेगळ्या दिशेला जात होते. काळजीने म्हणू लागले, “आमच्या सोबत चल आमच्याकडे पाणी आहे. आम्ही शेअर करू.” आतापर्यंत तहानेने घशाला कोरड पडलेली. बाहेर डोकावून पाहिले, तर उन्हाची तीव्रता तशी कमी झालेली. जवळपास दीड-दोन तास उलटून गेले असावेत. मी नम्रपणे नकार दिला. कारण मित्रांना मी सांगितले होते, ‘मी पोहोचेन तुमच्यापर्यंत.’ संकोचूनच पुढे केलेल्या बाटलीतून एक घोट पाणी प्यायलो आणि चालू लागलो.

    आनंदाचे रंग, आनंद तरंग…

    प्रत्येक पावलात वेदना आणि आजूबाजूला पसरलेल्या मृत प्राण्यांचे सापळे पाहून मनात नकारात्मक विचार घर करू लागलेले. त्या अवस्थेत एक व्हिडिओही रेकॉर्ड केला; ज्यात मी सुखरूप पुढच्या कँपपर्यंत पोहोचेन की नाही याची शाश्वती वाटत नव्हती. विरोधाभास असा की बाजूने खळखळते झरे वाहत होते. मात्र त्यातले पाणी पिण्यायोग्य नव्हते. मन शांत ठेवून निमूटपणे रस्ता शोधू लागलो. अल्बर्ट काम्यूचे वाक्य “there is pleasure in suffering” आत घुमत होते. जवळपास तास-दीड तास चालल्यावर एक पिका (सशाच्या जातीतला एक लहान प्राणी) दिसला. तो उड्या मारत मारत डावीकडे पळाला. कोणास ठाऊक का? मला वाटले की त्याच्यामागे जाऊन फोटो काढावा. काही क्षणातच पिका दिसेनासा झाला. मात्र मला एक कापलेल्या बाटलीचे तोंड बारीकशा घारेमध्ये खोचलेले दिसले. मी धावत तिथे गेलो. पाणी दिसायला अगदी स्वच्छ आणि निर्मळ. मुख्य झऱ्यातून एक छोटीशी धार गवतातून, दगडातून वाहताना नैसर्गिक पद्धतीने गाळण होत होती. सुटकेचा निःश्वास टाकत मी सगळ्या बाटल्या आणि वॉटर ब्लाडर भरून घेतले. याआधी पाणी पिण्यासारखी साधी गोष्ट इतकी आनंददायी असू शकते, याची कल्पनाच केली नव्हती.

    आता पाणी सापडल्यावर सारा दृष्टिकोणच बदलून गेलेला. मनात विचार येऊन गेला की पाणी इथे असताना इथेच का नाही थांबले सगळे? पुढचा विचार हा होता की माझ्याकडे टेंट आहे, जेवण आहे, स्टोव्ह आहे आणि पाणीही आहे, मग मी का थांबू नये? पण पुन्हा तेच दिलेले वचन आठवले, की “पोहोचेन तुमच्यापर्यंत.” एकमेकाशी संकेत साधण्याचे जवळ काही साधन नव्हते आणि त्यांना चिंतेत टाकण्याचा माझा हेतूही नव्हता.

    आता मी अगदी खोलवर शांत झालो. कुठेच पोहोचायची घाई नव्हती. डाव्या बाजूला सोबत असलेली माझी सावली आणि चहूबाजूंना पसरलेला एकांत प्रवासाला अक्षरशः एका उंचीवर नेत होता. त्या संध्याकाळी झालेला सूर्यास्त अद्भुत होता. कांगयात्से पर्वताच्या मागे एखाद्या रेनेसान्स पेंटिंगसारखी रंगाची उधळण झालेली. त्या संधिप्रकाशात किशोरीताईंचा यमन ऐकण्याची तीव्र इच्छा झालेली आठवते. ‘तोसे नेहा लागे’ या बंदिशीच्या गुंगीत अंधार कधी दाटून आला जाणवलेच नाही. मी निमूटपणे हेड टॉर्च लावून चालत राहिलो. बाजूने वाहणाऱ्या नदीचा खळखळाट भयावह वाटत होता. रात्रीच्या त्या गडद अंधारात नदीच्या पलीकडे मला काही हेड टॉर्च लुकलुकताना दिसले. मी फोनवर नकाशा पाहिला तर जाणवले की कँपसाइट तर पलीकडच्या बाजूला आहे. मात्र नकाशात नदीचा कुठेही उल्लेख नाही. घोंगावत्या प्रवाहाच्या आवाजात त्या बाजूने मित्र काय सांगतोय, हे स्पष्ट ऐकू येत नव्हते. त्यामुळे मी त्यांना सांगायचा प्रयत्न करून पाहिला की मी पुढे पूल शोधून क्रॉस करेन. मात्र त्यांच्या इशाऱ्यातून इतकेच कळले की पुढे कोणताही पूल नाही. नदी इथूनच पार करावी लागेल.

    कोसळता प्रवाह, हाडे गोठवणारे गार पाणी आणि कभिन्न अंधार यांचे एक घातक रसायन माझ्यासमोर आकार धारण करून उभे होते. मी बूट काढून गळ्यात अडकवले. बॅग पाठीला लावली आणि मन घट्ट करून पाहिले. पाऊल पाण्यात टाकले. क्षणभरातच संपूर्ण शरीर कोल्ड शॉकमध्ये गेले. कुणीतरी एकाच वेळी शेकडो सुया पायात खुपसल्याची जाणीव होत राहिली. क्षणार्धात नदीच्या पाण्याचा प्रवाह इतका वाढला की पुढच्या दोन पावलांतच माझा तोल गेला. काठीच्या आधाराने कसेबसे स्वतःला सावरले आणि माघार घेतली. मनाचा हिय्या करून पुन्हा एकदा पाण्यात शिरलो. दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केले आणि हेड टॉर्चच्या मिणमिणत्या दिव्यात नदी ओलांडली.

    “No man ever steps in the same river twice, for it’s not the same river and he’s not the same man…” उबदार स्लीपिंग बॅगमध्ये डोळे मिटताना हेरेक्लिटसचे हे वाक्य आठवत राहिले.

    दोन हात निसर्गाशी…

    मित्रांशी हितगुज साधताना कळले की त्यांना रस्त्यात पाणी सापडलेच नाही. तडफडत ते इथवर पोहोचले. इथे पोहोचल्यावरही दिलासा नव्हता. पाण्याचे स्रोत अजून एक कि.मी. पुढे होते. एकाने पर्याय नाही म्हणून झऱ्यातले अशुद्ध पाणी प्यायला आणि त्यामुळे त्याला भयानक पोटदुखीला सामोरे जावे लागले. त्या उंचीवर शरीराला पाणी न मिळाल्यामुळे माझ्या मित्राला एएमएस (Acute Mountain Sickness) झालेला. तो पूर्ण रस्ता भ्रमिष्ट अवस्थेत चालत आला. एएमएस म्हणजे मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन न पोहोचल्यामुळे उद्भवणारा आजार. ज्यात डोकेदुखी, उलट्या, थकवा, घाम येणे, मतिभ्रम (hallucinations) यांसारखी लक्षणे दिसू लागतात. मित्राचे ऑक्सिजनचे प्रमाण ५८ टक्क्यांपर्यंत खालावलेले. एक रात्र वाट पाहून बघूया, असे आम्ही ठरवले. कारण एएमएसवर एकच उपाय. तो म्हणजे खाली उतरणे. मला रस्त्यात पाणी मिळाल्याने मी अगदी नॉर्मल होतो. माझे ऑक्सिजनचे प्रमाण ८५ टक्क्यांवर वर होते, जे ५१०० मी. (१६,७०२ फूट) उंचीवर अपेक्षित प्रमाणात होते.

    दुसऱ्या दिवशी आम्ही तिघेच वातावरणाला सरावण्यासाठी हाइकवर निघालो. चढण कठीण होतीच, मात्र वातावरणात ऑक्सिजनची कमतरता असल्याने छोटी गोष्ट करायलाही मेहनत लागत होती. गार वारा, जांभळी फुले, नजर जाईल तिथवर हिमशिखरे! एका अद्भुत दुनियेत आल्यासारखे वाटत होते. ध्येय आता अगदी साफ दिसत होते. कोणत्या मार्गाने शिखरापर्यंत पोहोचायचे याचीही एक साधारण कल्पना आली होती. ‘क्लाइंब हाय, अँड स्लीप लो’च्या मूलभूत नियमानुसार आम्ही जवळपास ५४०० मी पर्यंतची खडी चढाई करून पुन्हा खाली बेसवर आलो.

    साद शिखराची

    शिखर पादाक्रांत करण्याचा दिवस उगवला, पण टीममध्ये उत्साहाऐवजी एक विचित्र निःस्तब्धता दाटून आली होती. आणखी एकाने समिट न करण्याचे ठरवले. तो इथवर येण्यातच खुश होता. ज्याच्या नावावर परमिट होते, तो खरेतर मोहिमेचा कणा होता. मात्र त्याचाही मूड खालावला. त्यानेही पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी शिखर जणू हाताच्या अंतरावर असूनही दूरवर निसटल्यासारखे वाटले. मी इतक्या लांब येऊन प्रयत्न न करताच माघारी जाण्याच्या कुठल्याच मनःस्थितीत नव्हतो आणि मला एकटे सोडायला ते तयार नव्हते. या संघर्षात माझी बरीच मानसिक ऊर्जा खर्च झाली. शेवटी बऱ्याच चढाओढीनंतर रात्री १० च्या सुमारास मी हेड टॉर्चच्या प्रकाशात अंधाराला भेदत ‘एकला चालो रे’ म्हणत पर्वतशिखराच्या दिशेने सरसावलो.

    तिकडच्या लोकल ग्रूपना मी विचारायचा प्रयत्न केला. मला त्यांच्यासोबत रोपअप होता येईल का? मात्र लेहमध्ये गाइड लोकांची एकाधिकारशाही आहे. आमच्याकडे लोकल गाइड नाही म्हणून त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिला. कुठल्याही मोहिमेत रोपअप होणे महत्त्वाचे मानले जाते. कारण कोणी जर क्रेवासमध्ये (ढिसूळ बर्फाळ भाग) पडले, तर बाकी मंडळी त्याला खेचून बाहेर काढू शकतात. इथे तर मी एकटाच माझी वाट शोधायला लागलो. तापमान शून्याच्या खाली तरंगत होते. वाढत्या उंचीसोबत माझ्याच श्वासोच्छ्वासाचा आवाज शांतता भेदत घुमत होता. मी हे सगळं का करतोय? का चढतोय? का उगाच जीवाची वणवण? या सगळ्या शंका आणि प्रश्नांवर मात करत मी बर्फाच्या पांढऱ्या चादरीवर हळूहळू पुढे सरकत राहिलो. पायात दीड किलोचे स्नो बूट, त्यावर क्रंम्पॉन (मेटलचे दातेरी खिळे) आणि हातात आइस अॅक्स (बर्फ फोडण्याची कुऱ्हाड) घेऊन मी ५८०० मी. (१९०२८ फूट) उंची गाठलेली.

    आता मी अक्षरशः शिखराच्या खांद्यावर उभा होतो. पुढे फक्त ३०० मी. शिल्लक होते. मात्र यापुढे जाणे मला सुरक्षित वाटत नव्हते. बरेचसे दृश्य नि अदृश्य बर्फखड्डे शिखरवाटेवर आढळत होते आणि रोपअप करायला सोबत कोणी नसल्याने एक छोटीशी चूक जीवघेणी ठरू शकत होती. अशा स्थितीत मनावर दगड ठेवून मी मागे फिरायचे ठरवले.

    डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते. पार हरल्यासारखे वाटत होते. हवालदिल अवस्थेत सकाळी ५ वाजता पुन्हा बेस कॅम्प गाठले. साडेसहाला तडक चोखदोच्या दिशेने उतरणीला लागलो; जिथे आम्हाला लेहपर्यंत न्यायला गाडी येणार होती. एक दिवस थांबून पुन्हा एकदा प्रयत्न करायचा मोह होत होता. मात्र मित्राचे ऑक्सिमीटर प्रमाण अजूनही सुधारले नसल्याने खाली जाण्याशिवाय पर्याय नव्हता. परतीच्या मार्गावर कांगयात्से पर्वताची शेवटची झलक दिसेपर्यंत मी ढसाढसा रडत राहिलो. याआधी मी आयुष्यात कुठल्याच गोष्टीसाठी इतके रडलो नसेन. कोंगमारूला पास (५२६० मी.) पार करून अँड कॅन्यनसारख्याच रंगीबेरंगी दगडांच्या व्हॅलीमधून पुढे सरकत चोगदो गाव (३९०० मी.) आणि मग गाडीने लेह गाठले. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळींवर थकवा जाणवत होता.

    दुसऱ्या दिवशी लेह मार्केटमध्ये फिरत असतानाच माझ्या मित्राचे अजून दोन मित्र विजित आणि श्यामा भेटले. ते कर्जीक म्हणजेच सोमोरिरी (Tsomoriri) इथे दोन महिने राहून आसपास असलेली, जमेल तितकी ६००० मी. शिखरे चढणार होते. माझ्यासाठी हे काहीतरी भन्नाटच होते. हे असे पण शक्य असते? नोकरीधंदा, अभ्यास न करता आयुष्यातले दोन महिने एखाद्या छोट्याशा गावात राहून स्वतःच्या आवडीची गोष्ट म्हणजेच गिर्यारोहण करायचे. मी भलताच इंप्रेस झालो. माझ्याकडे अजून सहा दिवस होते आणि लेह-लडाख मी आधीच फिरलो असल्याने मला पर्यटनी उथळ स्वरुपाच्या गोष्टी करण्यात काहीच रस नव्हता. माझी त्यांच्याशी तशी ओळख नव्हती. मात्र निर्लज्जपणेच मी त्यांना विचारायचे ठरवले, ‘एखाद्या मोहिमेसाठी मीही तुमच्यात सामील झालो तर चालेल का?’ सुरुवातीला ‘आम्ही ओळख नसलेल्या लोकांसोबत चढाई करत नाही’, असे म्हणून त्याने टाळले. मात्र माझी जिद्द आणि इच्छाशक्ती पाहून शेवटी होकार दिला.

    अधिक देखणे तरी…

    पुढच्याच दिवशी सकाळी पाचच्या ठोक्यावर आम्ही तिघं कर्झाकच्या दिशेने रवाना झालो. तिथे पोहोचताच एका स्थानिक घरात मुक्काम शोधला. आपल्या मुलांसारखेच त्यांनी आम्हाला आपलेसे म्हटले. प्रेमाने दावा, नामग्याल आणि अंग्याल अशी तिबेटी नावेदेखील दिली. त्यांच्या खिडकीतून दिसणाऱ्या सोमोरिरी तलावाच्या गडद निळ्या रंगाच्या मी बघताच क्षणी प्रेमात पडलो. तळ्याच्या काठावर एक वेगळाच शांत-निवांतपणा होता. संध्याकाळी आकाशाचे तलावात पडलेले प्रतिबिंब इतके एकरूप झाले होते की खरेच पाणी कोणते आणि आभाळ कोणते असा प्रश्न पडावा.

    ‘मसान’ चित्रपटातल्या गाण्यात वरुण ग्रोवर म्हणतो, तसे ‘उल्टा करके देख सके तो अंबर भी है गहरी खाई’ असेच काहीसे दृश्य होते. सोबत असलेले दोघेही ज्ञानी आणि रसिक होते. गिर्यारोहण, अल्पायनिझम, चित्रपट, फिलॉसॉफी अशा बऱ्याच विषयांवर आमची चर्चा रंगली. मागच्या अनुभवापेक्षा एक वेगळीच ऊब इथे जाणवली. ‘The Alpinist’ ही मार्क-अँड्रे ले क्लेर्क याच्या आयुष्यावर आधारित एक सुंदर डॉक्युमेंट्री त्यांनी मला आवर्जून बघायला लावली. म्हणाले, “जगात जर कोणी Pure Alpinist असेल तर तो हा आहे.”

    पुढचा टप्पा होता, मेनटॉक कांग्री चढण्याचा. याचा प्लान अगदी सोपा होता. मधे एक कैंप सेटअप करायचा आणि मग तिथून शिखर गाठायचे. चालता चालता मी विजितला सहजच विचारले, “alpinism म्हणजे तुझ्यासाठी नक्की काय?” त्याने दिलेलं उत्तर आजही मनात घर करून आहे. “Meiky-Shisui.” जपानी भाषेत त्याचा अर्थ स्वच्छ आरसा किंवा स्थिर पाणी असा होतो. अशी अवस्था जिथे मन निसर्गाशी पूर्णपणे एकरूप होऊन जाते. त्यांच्यासोबत चालताना मी नकळतच एका नवीन दृष्टिकोणातून जगाकडे पाहायला शिकत होतो. अगदी हसत-खेळत आम्ही पहिला टप्पा पार पाडला नि १८,५०० फुटांवर बेस बनवला.

    इतक्या मोठ्या हिमपर्वतावर फक्त आम्हीच होतो. ही अनुभूतीच काहीतरी अद्भुत होती. रात्री झोपताना पं. मिलिंद रायकर यांचा व्हायोलिनवरचा शुद्ध नट ऐकून आम्ही तिघेही भारावून गेलेलो. त्या लाइव्ह रेकॉर्डिंगमध्ये बाबांची सतत येणारी दाद ऐकून काही क्षणासाठी घरी असल्याचा भास झाला. मात्र ‘Home is where you are’ यावर माझा ठाम विश्वास आहे.

    शिखर चढाईच्या नव्हे, आत्मज्ञानाच्या दिशेकडे… 

    रात्री एक वाजता गजर झाला. समिट पुशची तयारी सुरू झाली. समोर दिसणाऱ्या नालीतून आम्ही सरळ वर चढायचे ठरवले होते. सुरुवातीला मार्ग तुलनेने सुसह्य वाटत होता, पण बघता बघता चढाई खडी होत गेली. आइसअॅक्स आणि क्रंम्पोनच्या साह्याने थ्री-पॉइंट तंत्र वापरून आम्ही मुंगीसारखे हळूहळू वर चढत होतो. घड्याळात पाहिले, तर ६००० मी.ची उंची आम्ही पार केलेली. मी आतापर्यंत सर केलेली ही सर्वात उंच जागा होती. चेहऱ्यावर एक स्मित उमटले. मात्र पुढच्या १०० मीटरमध्येच समोर एक मोठा क्रेवास आमच्या आणि शिखराच्या मधोमध अडथळा बनून ठाकलेला दिसला. आम्ही कदाचित याआधी कधीच न चढलेला असा अनवट मार्ग निवडलेला होता. पहाटे साडेचारच्या अंधारात हलका बर्फ पडायला सुरुवात झाली होती. क्रेवास इतका खोल आणि रुंद होता की मी त्याच्याकडे एकटक पाहतच राहिलो. ‘And if you gaze long into an abyss, the abyss also gazes into you.’ नित्शेचे हे वाक्य मनात विजेसारखे चमकून गेले.

    वातावरण बिघडत चाललेले. आमच्याकडे असलेल्या मर्यादित उपकरणांसोबत त्या क्षणी क्रेवास पार करणे धोक्याचे होते. अवघ्या १०० मीटर्सनी समिट हुकले होते. मात्र या वेळी कसलेच दुःख नव्हते. माझ्या पोत्यात बरेच अमूल्य अनुभव, ज्ञान व दृष्टिकोण घेऊन मी खाली उतरत होतो. “Summit is optional, but coming back is mandatory.” 

    एकंदरीतच या दोन मोहिमेतून इतके जाणवले की गिर्यारोहण जितके शारीरिक आहे, त्याहूनही अधिक मानसिक आहे. घरी परतलो मात्र काही गोष्टी खोलवर बदलून गेलेल्या. इतक्या ताकदीचा अनुभवातून गेल्यानंतर पुन्हा तसेच जगणे शक्य नव्हते. महिनाभरातच मी यूपीएससी सोडण्याचा निर्णय घेतला. पूर्णवेळ आउटडोअर्समध्ये काम करायचे ठरवले. आई थोडी नाराज झालेली. कुठे फॉरेस्ट ऑफिसर आणि कुठे हे आउटडोअरचे फॅड ! एक आठवडाभर तरी तिने सायलेंट ट्रीटमेंट देत तिची नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. अभ्यासात तसा बरा असल्याने घरच्यांच्याही काही अपेक्षा होत्या; ज्या साहजिक आणि योग्यही होत्या. बाबांनी लहानपणी निसर्गाची आवड लावली. झाडे, फुले, पक्षी, फुलपाखरे बघायला शिकवली. तरीही ट्रेकिंग हे काही आयुष्य नाही, ही त्यांची भूमिका असायची. या वेळी मात्र त्यांनी पाठीशी उभे राहून मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. या क्षेत्राबद्दल इतकी अनिश्चितता असूनसुद्धा दोघांनीही मला माझे निर्णय घेण्याची मोकळीक दिली.

    मी वर्षभर काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड अशा हिमालयीन पट्ट्यात बरेच ट्रेक लीड केले. अरुणाचल, मेघालय, स्पिती यांसारख्या दुर्गम ठिकाणी रोडट्रिप केल्या. स्नो लेपर्ड पहिला, NOLS (नंदादेवी आऊटडोअर लीडरशिप स्कूल) सोबत काही कोर्सेस केले आणि गेले वर्षभर यूएई आणि अमेरिकेमध्ये आऊटडोअर इन्स्ट्रक्टर, अॅडव्हेंचर ट्रिप गाइड व घोडस्वारी तज्ज्ञ अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या.

    हे सगळे करताना इतकेच जाणवले की अजून बरेच काही अनुभवायचे बाकी आहे. आता कुठेतरी कसे जगायचे याचा अंदाज यायला लागलाय…

    Why climb a mountain?

    Look! A mountain there.

    I don’t climb mountain.

    Mountain climbs me.

    Mountain is myself.

    I climb on myself.

    There is no mountain.

    nor myself.

    Something

    Moves up and down

    In the air.

    • Nanao Sakaki

    प्रस्तुत लेख लिहिला तेव्हा स्वप्निल गणेश कुलकर्णी यांचा पत्ता यूएसए/यूएई असा होता.

    संपर्क: swapnakoo120@gmail.com

    Author

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *