Headlines

    भूल दिलेल्यांच्या प्रदेशात पावसाचे थैमान…सत्तेचे विकासगान

    0 Shares

    सत्यार्थी

    सगळे काही हाताबाहेर गेलेले आहे. पण कोणी कबूल करत नाही. हिशेब असा की, दणदणीत घोषणा द्या आणि उद्घाटने करा, जनता त्यात गुंगलेली राहील. इथे महाराष्ट्रात-मुंबईत-पुण्यात पावसाने कहर माजवला आहे, पण वर्तमानपत्रांत पानपानभर जाहिराती छापून येताहेत उ. प्रदेशाच्या विकासाच्या. जी राम जी नामक क्रांतिकारी योजनेच्या. हिशेब हा की, विकासाच्या प्रगतीच्या जाहिरातींची अहोरात्र मारा करत राहा. हे गिरवून गिरवून पक्के केलेले भूलतंत्र आहे. या भूलतंत्रामुळे जनतेला वर्तमानातल्या समस्या जाणवूच नये. त्यामुळे जगात भारताचा मान वाढला या भ्रमात जनता राहते. या जनतेला हे कोणी सांगतच नाही की, या मान वाढलेल्या देशाचा ताजा पासपोर्ट इंडेक्स १२५ इतका म्हणजे तळाच्या दिशेकडचा, मागचा आहे. या पासपोर्टची ताकद एवढी आहे, की जगातल्या जेमतेम २६ देशांमध्ये भारतीयांना व्हिसामुक्त प्रवेश आहे. या जनतेला कोणी सांगतच नाही की, भारत ही जगातली तिसरी वा चौथी नव्हे, सहावी ‘मोठी’ अर्थव्यवस्था आहे. या मोठ्या अर्थ व्यवस्थेचे गुपित खरोखरच्या प्रगतीमध्ये नाही, तर अगडबंब लोकसंख्येत दडले आहे.

    इथे, मतदार हा आपला विनाऑपरेशन कायमस्वरुपी अॅनास्थेशिया दिलेल्या अवस्थेत. त्याला समस्येची संवेदना जाणवतच नाही. जाणवते कोणाला, ज्याच्या घरचे माणूस उघड्या गटारात पाय पडून वाहून जाते. ज्याचे मूल शाळेतून घरी येण्याआधी झाड अंगावर कोसळून थेट देवाघरी जाते. ज्याचे घर एका क्षणात ढिगारा बनून जाते. मुंबईतल्या मानखुर्द भागात चाळ जमीनदोस्त होऊन रहिवाशी मरण पावतात. पुण्यात घरे ढिगाऱ्याखाली गाडली जातात. तिथला आक्रोश तिथेच विरतो. बाकीचे लोक सोशल मीडियावरचे रील पाहून तेवढे हळहळत बसतात. बाकी, जो मनुष्य मुंबईतल्या पावसातली झालेली दैना अनुभवतो, त्याच्या हालास पारावर उरलेला नसतो. तो रोज घराबाहेर पडल्यानंतर पाहातो, जिकडे पाहावे तिकडे बांधकामे सुरु आहेत, रस्ते खोदलेले आहेत, रस्त्यांवर खड्डे आहेत, अर्धवट बांधकामामुळे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. कोणत्याही स्टेशनाबाहेर गुडघाभर पाणी साचलेले आहे. पण विकास आणि प्रगतीची दिलेली भूल त्याला यंत्रवत बनवून टाकते. तो नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहतो. पण वेळ येताच …आगे बढो…हम तुम्हारे साथ है…गर्व से कहो हम…  म्हणत संस्कृती श्रेष्ठत्वाच्या प्रदर्शनात, यात्रांमध्ये सामील होतो. वेळ येताच त्याच भूलावस्थेत ज्यांना लाखोली वाहिली, त्यांनाच मतदार करून लोकशाहीचे पवित्र कार्य पार पाडल्याच्या समाधानात आणि  मोठ्या टेचात सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करतो.

    काँग्रेस हा नालायक सत्ताधारी होता. त्याने या देशाची प्रगती रोखली, विकास रोखला, हे इतक्या वेळा त्याने भूलतज्ज्ञ नेत्यांकडून ऐकलेले असते. त्यावर त्याचा साहजिकच विश्वास बसतो. काँग्रेसने प्रगतीचा वेग रोखला म्हणजे, आपण विकासाच्या टप्प्याच्या कैक वर्षे मागे आहोत, त्यामुळे आपल्याला टॉप गिअरमध्ये विकासाची कामे केली पाहिजेत, हेही तो पटवून घेतो. सत्ताधारी अॅक्सलरेटरवर पाय ठेवतात आणि भूमिपूजन, उद्घाटनाचे एकावर एक  सोहळे रचत जातात. या सोहळ्यांमध्ये न चुकता काँग्रेस हाच विकासाचा नंबर एकचा शत्रू होता, हे सांगत राहतात. विरोधकांवर शाब्दिक कोट्या, आव्हाने, दमबाजी अशीही होत राहते. भूल न उतरलेले लोक यंत्रवत सारे एन्जॉय करत राहतात.

    प्रत्यक्षात, प्रगती, विकास, विकासाचा आवश्यक वेग यामागे सत्ताधारी, नोकरशाही आणि विकासोत्सुक उद्योजकांनी वेगळेच गणित रचलेले असते. वेगळेच हितसंबंध कार्यरत झालेले असतात. असे हितसंबंध जिथे तयार होतात, तिथे पहिला बळी दर्जाचा जातो. अर्थातच दुसरा बळी विकासकामाच्या टिकाऊपणाचा जातो. त्याचमुळे वरवर चकाचक, दिलखेचक, भव्यदिव्य असणारे बरेच गेल्या काही वर्षांत उद्घाटनानंतर काहीच काळात उघडे पडत गेले, या मागे हा अनैसर्गिक वेग आणि दर्जाशी तडजोड करणारे हितसंबंध आहेत, हे एकदा नाही अनेकदा दिसून आले आहे. जे दिसतेय, तोच आधार आहे. कारण, हल्ली सिद्ध काहीच होत नाही. ना शासनाच्या दारी ना, न्यायालयाच्या दारी.  

    मिसिंग लिंकच्या मार्गावर खड्डे पडणे, एका बाजूचा छताचा भाग कोसळणे, नव्या कोऱ्या बोगद्यात पावसाचे पाणी गळणे हा त्याच दर्जाशी तडजोड करणाऱ्या हितसंबंधांचा परिपाक आहे. राजकीय, शास्त्रीय स्पष्टीकरणे काहीही येऊ देत आपण विकसित आहोत, अशा भ्रमात राहणाऱ्या व्यवस्थेला हे सारे लाज आणणारे आहे.

    मुळात, काहीही करून विकासाची इतकी घाई कशासाठी आहे, विजेच्या खांबाच्या उद्घाटनापासून मिसिंग लिंकच्या उद्घाटनापर्यंत भव्यदिव्यतेचा सोस कशापायी आहे?

    देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी पायाभूत विकासाची जी काही कामे ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत करायची आहेत, त्याचा गाजावाजा कशासाठी आहे, या विकासाच्या नित्यक्रमात घडणाऱ्या घटना का ठरत नाहीत…आम्ही हे केले, आम्ही ते केले, आम्ही यंव केले नि आम्ही त्येव केले…आम्हीच भारताच्या विकासाचे कर्तेधर्ते, आम्हीच भारताच्या प्रगतीचे उद्धारकर्ते हा सोस कशासाठी आहे? देशाचा पायाभूत विकास करणे आणि त्या योगे देशाची आर्थिक प्रगती साधणे हे कोणत्याही सत्ताधारी व्यवस्थेचे आद्य कर्तव्य आहे. त्याचा गाजावाजा कशासाठी होतो आहे?  सरकार हे पालकाच्या भूमिकेत आहे. पालकाने आपल्या कुटुंबाच्या विकासाचे आणि प्रगतीचे हरघडी ढोल बडवत राहणे हे कोणत्या सुसंस्कृतपणाच्या व्याख्येत बसणारे आहे?

    देशाचा विकास हा शांततेत व्हायला हवा, विध्वंसाच्या अशांततेत नव्हे,  देशाची प्रगती विनम्रतेत व्हायला हवी, उद्दामपणात नव्हे. पण हे सारे भूल दिलेल्या जनतेला कळेलच अशी सध्याची स्थिती नाही.

    थोडक्यात,  यंदाच्या पावसाने दिल्लीपासून गल्लीपर्यंत नेते-सत्ताधाऱ्यांना जसे उघडे पाडले आहे, तसेच भूल दिलेल्या अवस्थेत वावरणाऱ्या, यंत्रवत बनलेल्या जनतेची शोकात्म कहाणीसुद्धा उघड केली आहे.

    Author

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *